आपली भाषा निवडा: घरपोच ग्रंथसेवा


श्लोक ३

पश्यैतां पाण्डुपुत्राणामाचार्य महतीं चमूम्‌ ।
व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता ॥ १-३ ॥
अन्वय- आचार्य = अहो आचार्य, तव = तुमच्या, धीमता = बुद्धिमान, शिष्येण = शिष्याने, द्रुपदपुत्रेण = द्रुपदपुत्र धृष्टद्युम्नाने, व्युढाम्‌ = व्युहरचना केलेली, एताम्‌ = ही, पाण्डुपुत्राणाम्‌ = पांडूच्या पुत्रांची, महतीम्‌ =विशाल, चमूम्‌ = सेना, पश्य = पाहा ॥ १-३ ॥
अर्थ-“अहो आचार्य! तुमच्या बुद्धिमान शिष्याने द्रुपदपुत्र धृष्टद्युम्नाने व्यूहरचना केलेली ही पांडूपुत्रांची प्रचंड सेना पहा”
स्पष्टीकरण- इथे दुर्योधनाने आपला पक्ष अधिक बळकट केलाय! कौरवांप्रमाणेच द्रोणाचार्य हे पांडवांचे गुरुवर्य होते. तरी अर्जुनावर त्यांचे विशेष प्रेम होते. त्याकरीताच “ब्रह्मशिरस” अस्त्राची विद्या त्यांनी केवळ अर्जुनास शिकवली होती. पण ह्या प्रसंगी आता त्यांचे मन तिकडे वळू नये म्हणून त्याने धृष्टद्युम्नाची आठवण  करून दिली. आपल्या (द्रोणाचार्यांच्या) वधासाठी हा जन्मलेला असताना देखील तुम्ही त्याला शस्त्रविद्या शिकवली व आज तोच तुमची विद्या तुमच्या विरुद्ध वापरत आहे. त्यात द्रुपद आणि द्रोणाचार्यांचे वैर होते. या जुन्या वैराचे स्मरण पण दुर्योधनाने स्वतःच्या गुरूंना करून दिले. तसेच सूड घेण्याची हि उत्तम वेळ आहे हे सुचवतो.
पांडवांची सेना ७ अक्षौहिणी तर कौरवांची ११ अक्षौहिणी सेना होती. तरी पण हा अहंकाराचा महामेरू पांडव सैन्याला प्रचंड म्हणत होता. त्याची २ कारणे होती.
१) व्यूहरचनेमुळे सेना कमी असून देखील प्रचंड असल्याची भासत होती.
२) पांडव सैन्यात योद्धे हे एकमताने लढत होते. त्यामुळे एकजुटीच्या कारणाने हि सेना प्रचंड होती. कौरव सैन्यात हि एकजूट नव्हती. कुणी स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी, कुणी सुडाच्या भावनेने, कुणी कर्तव्यापोटी, तर कुणी आपल्यावरील उपकाराची परत फेड करण्यासाठी आलेले होते. तरीही पांडव सेनेतील कित्येक महारथी योद्धे हे आपलेच (द्रोणाचार्यांचे) शिष्य आहेत व त्यांना पराजित करणे तुम्हाला फारसे अवघड नाही, हेच तो वारंवार पटवून देत आहे!

टीप-
१) धृष्टद्युम्न -हा द्रुपदाचा पुत्र ! द्रौपदीचा सख्खा भाऊ ! द्रुपदाने द्रोणाचार्यांच्या वधासाठी पुत्र प्राप्ती व्हावी ह्या उद्देशाने यज्ञ केला व यज्ञकुंडातून कवच-कुंडलांसह हा उत्पन्न झाला. पुढे पांडव सेनेचा हा सेनापती झाला. भगवान श्रीकृष्णांच्या मार्गदर्शनाने ह्यानेच द्रोणाचार्यांचा वध केला.
२) १ अक्षौहिणी सेना=२१८७० रथ,२१८७० हत्ती,६५६१० घोडे आणि १०९३५० पायदळ सैनिक हे युद्ध धर्मसत्ता व राजसत्तेतील होते. यावरून एक गोष्ट निश्चितच लक्षात येईल की धर्माने वागणाऱ्या माणसांची संख्या ही कमीच असते! पण तरीही विजय हा नेहमी धर्मसत्तेचाच होत आला आहे व होत राहणार आहे! यात मुळीच शंका नाही.
।। श्रीकृष्णार्पणमस्तु ।।


।। श्री गुरुदेव दत्त ।।

Privacy Policy